Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आमदार डॉ बालाजी किणीकर यांना स्वपक्षातुनच खुलं आव्हान...

 आमदार डॉ बालाजी किणीकर यांना स्वपक्षातुनच खुलं आव्हान...


माजी नगरसेवक संदिप भराडेंच्या बैनरमुळे चर्चांना उधाण ...


           ब्लॅक अँड व्हाईट/ उल्हासनगर | प्रफुल केदारे | :

महाराष्ट्र भरात विधानसभा निवडणुकींचे पडघम आता वाजू लागले आहेत. राजकीय पक्ष आपापली दावेदारी आणि जागा निश्चिती करिता युद्धबळ वापरताहेत. अनेक जण पक्षातूनच बंडखोरी करण्याच्या मार्गावर किंवा पक्षातून प्रस्थापित उमेदवारांच्या बदल्यात स्वतःसाठी नवा पर्याय म्हणून पक्षश्रेष्ठींनी आपला विचार करावा यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात १४० मधून गेले तीन टर्म शिवसेनेचे डॉ बालाजी किणीकर हे आरक्षित मतदारसंघातून आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतले असल्यामुळे त्यांची चौथ्यांदाही तिकीट निश्चिती होण्याच्या मार्गावर आहे.  

                   परंतु , अशातच शिंदे गटातीलच बाळाहाहेबांची शिवसेनेचे माजी नगरसेवक एड. संदीप भराडे यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी नेताजी चौक, कैंप नंबर ५ मध्ये भावी आमदार म्हणून बॅनर झळकवले आहेत . यामुळे डॉ बालाजी किणीकर यांना आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याने आव्हान दिल्याचं चित्र आता समोर येत आहे. अंबरनाथच्या शिवसेनेच्या राजकारणात अरविंद वाळेकर विरुद्ध डॉ. बालाजी किणीकर या गटांमध्ये कायमच वर्चस्ववाद धुमसत असतो. अलीकडेच अरविंद वाळेकर यांनी बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे टीकाही करुन नापसंती दर्शवलीय. संदीप भराडे हे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून गेल्या पाच वर्षात घाडगे नगर या परिसरातून नगरसेवक होते.

                    संदीप भराडे हे २०१४ मध्ये अंबरनाथच्या घाडगे नगर, मेटल नगर प्रभागातून सर्वाधिक मतांनी निवडून आलेले नगरसेवक आहेत. नगरसेवक काळात पाणीपुरवठा सभापती असतांना नगरपालिका स्तरावर पाण्याचा हा प्रश्न सोडविण्याचा आपण बहुतांशी प्रयत्न केलाय. परंतु, त्याला स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने मर्यादा होत्या. आमदारांनी अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळवलीय, परंतु, अस्तित्वात आलेले फार कमी दिसताहेत. शासनाकडे पाणी, वाहतुककोंडी, प्रदूषण, या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाहिजे त्या ताकतीने शासन हे प्रश्न मांडले नसल्याची खंतही भराडे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केलीय.  

                     तसेच गेल्या दहा पंधरा वर्षात अंबरनाथ चा पूर्वेकडील प्राईम लोकेशन चा चेहरा काहिसा बदलला असला तरी अंबरनाथ मधील चाळी, झोपड्या, आदिवासी पाडे , वाड्या येथील मूलभूत प्रश्न सोडवण्यात ते अपयशी ठरल्याने अंबरनाथला विकासाचा चेहरा न बदलल्याचा आरोपही भराडे यांनी केलाय. आपण पक्षाचे तिकीट मिळण्यासाठी स्थानिक पक्षश्रेष्ठींशी व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केला असुन, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला यावेळी लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी करणार असल्याचेही भराडे यांनी सांगितले आहे.       

              सुभाष टेकडी परिसरात नुकत्याच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा बळजबरीने उद्घाटनाचा घाट घातल्याने आंबेडकरी समाज नाराज असुन, आमदार डॉ. बालाजी किणिकर यांच्या विरोधात असंतृष्ट तरुण कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन संदीप भराडे यांचा भावी आमदारचा बॅनर लावल्याची प्रतिक्रिया एड प्रशांत चंदनशिवे यांनी दिली. एकंदरीत, आता, संदीप भराडे शिवसेनेतूनच डॉ बालाजी किणिकर यांना शह देण्यासाठी आव्हान देताहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आ

हे. 

Post a Comment

0 Comments