भाजप १५६, शिवसेना शिंदे गट ७८ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५४ जागा, महायुतीचा फॉर्म्युला ठरला..?
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत कालपासून महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत खलबते सुरू झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे राज्यातील नेते काल दिल्लीत दाखल झालेत.
ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत महायुतीच्या नेत्यांची दिर्घकाळ चर्चा झाली. यानंतर राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे, २५ ते ३० मतदारसंघाबाबत अजूनही तिढा असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर दिली आहे.यातच राज्यातील २८८ मतदारसंघानुसार भाजपच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. यानुसार भाजप १५६, शिवसेना शिंदे गट ७८ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ५४ जागा मिळणार आहे. भाजपला त्यांच्या कोट्यापेक्षा लहान पक्षांना जागा द्याव्या लागतील आणि कोणत्याही पक्षाकडे विजयी उमेदवार नसल्यास ५ ठिकाणी प्लस मायनस केले जाऊ शकते अशी चर्चा आहे. परंतु महायुतीची अधिकृत यादी अजूनही समोर आलेली नाहीय.
दरम्यान, महाविकास आघाडीची देखील मुंबईत मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी एकत्रित उमेदवार जाहीर करणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्ररित्या उमेदवार जाहीर करणार याबाबत निर्णय होणार आहे. जर महाविकास आघाडी म्हणून निर्णय झाला तर आज १०० उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीत ८५ जागांवर लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन ८५ वर चर्चा झालीय.
.jpg)


Post a Comment
0 Comments