Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ठाणे जिल्ह्यातील 7 मतदारसंघात महायुतीत संघर्ष तर 2 मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी

 ठाणे जिल्ह्यातील 7 मतदारसंघात महायुतीत संघर्ष तर 2 मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी


कोकणातील नऊ मतदार संघात बंडखोरीचा फटका प्रस्थापित राजकीय पक्षांना बसला असून यामध्ये सर्वाधिक 7 मतदार संघात महायुतीमध्ये तर 2 मतदार संघात महाविकास आघाडीत बंडखोरी उफाळून आली आहे.या बंडखोरीमुळे अनेक ठिकाणी भाजप विरोधात भाजप बंडखोर, शिंदेच्या शिवसेने विरोधात भाजप बंडखोर तर शिंदेंच्या शिवसेने विरोधात शिंदेच्याच शिवसेनेचे बंडखोर असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघात काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. त्यामुळे या बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीसमोर आहे.

जागा वाटपावरून आणि त्यानंतर मतदार संघात उमेदवारी देण्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत बंडखोरी होऊ नये यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही नेत्यांचे प्रयत्न अपयशी ठरले असून कोकणातील 9 मतदार संघात बंडखोरी उफाळून आली आहे.

विक्रमगड मतदार संघात शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश निकम यांच्या विरोधात भाजपच्या हरिश्चंद्र भोये यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी मधून सुनील भुसारा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सावंतवाडी मतदार संघातून ठाकरे गटाकडून राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र तेली यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रावादीतुन अर्चना घारे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कर्जत मतदार संघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून सुधाकर घारे तर भाजपकडून किरण ठाकरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमध्येच या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तर नितीन सावंत हे ठाकरे गटाकडून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

ऐरोली मतदार संघात भाजपकडून पुन्हा माजी मंत्री गणेश नाईक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. मात्र त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने विजय चौघुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने या ठिकाणी भाजप विरोधात शिंदेची शिवसेना असा सामना रंगणार आहे. कल्याण पश्चिम मतदार संघातून शिंदे गटाकडून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना निवडणुकीत उतरवण्यात आले आहे. मात्र त्यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपचेच शहर अध्यक्ष वरून पाटील यांनीही अर्ज दाखल केल्याने या ठिकाणी महायुतीमध्येच तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

कल्याण पूर्व मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार सुलभा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेकडून महेश गायकवाड हे देखील निवडणुकीत उभे ठाकले आहेत. गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वाद उफाळून आला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर ठाकरे गटाकडून धनंजय बोराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात आघाडीत बिघाडी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे असा सामना रंगला असताना काँग्रेसकडून मनोज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत रंगत आणली आहे. ठाण्यातील चारही मतदार संघात एकही जागा न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचे आधीच ठाणे काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

बंडखोरीमुळे दोघांनाही फटका बसण्याची चिन्हे

ओवळा-माजिवडा मतदार संघातून पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेतुन विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक नरेश मणेरा असा सामना असताना या ठिकाणी भाजपचे माजी महापौर हसमुख गेहलोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला आहे. याच मतदार संघाला लागून असलेल्या मिरा-भाईंदर मतदार संघातून विद्यमान आमदार गीता जैन यांना डावलल्याने गीता जैन यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर या ठिकाणी मुज्जपर हुसेन काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने याचा चांगलाच फटका दोघांनाही बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या बंडोबांना थंड करण्याचे शर्थीचे प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीला करावे लागणार आहेत हे निश्चित आहे.

Post a Comment

0 Comments