देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणार्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही .....
शिवसेना शिंदे गटाच्या असहकार्यामुळेच भिवंडी लोकसभेला भाजपचा पराभव : माजी आमदार नरेंद्र पवार
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
देशात आणि राज्यात, भारतीय जनता पक्ष कायम आपल्या सहकारी पक्षांना बरोबर घेऊन काम करीत आहे. भाऊ छोटा असू किंवा मोठा त्याने भावा सारखं वागलं पाहिजे, हीच भूमिका आमची महायुतीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक महत्वपूर्ण योजना शेवटच्या गरजू माणसापर्यंत पोहचवण्याचे काम गेली १० वर्षांपासून करीत आहे. जनतेसाठी कायम कार्यरत राहणं हे माझ्यावरील संस्कार आहे. यात बंडखोरीचा विषय आला कुठे ? ज्यांनी खंजीर खुपसण्याची भाषा केली. त्यांनी भिवंडी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी काम करून देशाचेपंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे जोरदार उत्तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या सामाजिक कार्यावर बोट ठेवत, बंडखोरीच्या व पाठीत खंजीर खुपसणार्याच्या विधानावर ते बोलत होते. निवडणुका आल्या की काम, हे माझ्या सामाजिक व राजकीय कामाचे सूत्र नाही. सतत कार्यरत राहून सामाजिक व राजकीय प्रवास मी आजवर केला आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत जनतेने मला कल्याण पश्चिम विधानसभेचं नेतृत्व देऊन आमदार केले. त्या ५ वर्षाच्या कालावधीत मी अनेक विकास कामे केली. त्यानंतर सन २०१९ च्या निवडणुकीत जनता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अपक्ष निवडणुकीला सामोरे गेलो. त्यावेळी मला दुसर्या क्रमांकाची ४४ हजार मते मिळाली. निवडणुकीत पराभव झाला म्हणून मी काम करणे सोडले नाही. या उलट पराभव झाल्यानंतर लगेच तातडीने कामाला सुरुवात केली आणि आज देखील करतोय. लाडकी बहीण, महात्मा फुले आरोग्यदायी योजना, मुख्यमंत्री सहाय्यता योजना, आभा व आयुष्यमान आरोगी विमा योजना, मुद्रा योजना, कौशल्य विकास योजना, विश्वकर्मा योजना, एक दिवासीय दाखले वाटप, आधारकार्ड, स्वच्छता अभियान, वृक्षा रोपण, वह्या वाटप, प्रश्नसंच वाटप, रस्ते विकास – चौक सुशोभीकरण आदी योजना आपण सक्षमपणे जनसंपर्क कार्यालयातून राबवतोय, नागरिकांना त्याचा लाभ मिळतोय याचा मला आनंद आहे.
दरम्यान मी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महायुतीची कामे जनते पर्यंत पोहचवतोय किंवा काम करतोय यात काही गैर नाही. खासदारकीच्या निवडणुकीत भिवंडी लोकसभा क्षेत्रात या लोकांनीच महायुतीत मिठाचा खडा टाकला. त्यांच्या असहकार्यामुळेच भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीत खंजीर खुपसणार्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही असे चोख प्रतित्तोर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिले.
.jpg)


Post a Comment
0 Comments