गणेशोत्सव करूया छान
राखूया पर्यावरणाचे भान
ब्लॅक अँड व्हाईट / विशेष लेख
लेखिका. सौ अनिता पाटील
श्रावणात वेध लागतात ते म्हणजे गणेशोत्सवाचे.भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोठ्या थाटामाटात वाजत गाजत ढोल-ताशाच्या गजरात श्रीगणेशाचे आगमन होते. भक्ती भावाने आपण पूजापाठ करतो आणि आपल्या प्रथेनुसार दीड दिवसांचा,पाच दिवसांचा ,सात दिवसांचा, दहा दिवसांचा गणपती बाप्पां घरात आणतो.मग वेळ येते ती बाप्पाला निरोप देण्याची. पण निरोप देताना आपण कधी विचार करतो का की बाप्पाला निरोप देताना आपण पर्यावरणाची किती हानी करत आहोत. ज्यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या लोकमान्य टिळकांनीही कधी विचार केला नसेल की आपण जो गणेशोत्सव सुरू करत आहोत त्याचे भविष्यात असे पर्यावरण विघातक परिणाम होतील.
टिळकांनी उदात्त हेतूने गणेशोत्सव सुरू केला.त्यामागे फक्त देवभक्ती,देशभक्ती हीच भावना नव्हती. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे व इंग्रजांविरुद्ध उठाव करणे गरजेचे होते आणि म्हणून यानिमित्ताने सर्व गावातील माणसे एकत्र येत होती त्यांच्यात एकोपा निर्माण होऊन एकीचे दर्शन घडत होते. त्याकाळी मोठ्या भक्ती भावाने एका गावात एक गणपती बसत होता परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बऱ्याच वर्षांनी घरोघरी गणपती बाप्पा बसवण्याची प्रथा सुरू झाली आणि हळूहळू एक गाव एक गणपती किंवा लोकांमध्ये एकी निर्माण होणे ही भावना मागे पडत गेली.
हे एवढ्यावरच थांबले नाही तर गणपती जागवणे या नावाखाली पत्त्याचा डाव रंगू लागला आणि गणेशोत्सवाला गालबोट लागायला सुरू झाले. त्यानंतर कानठळ्या बसतील असा डीजेचा आवाज ढोल ताशांचा आवाज यामुळे शांतता भंगू लागली. मखर सजावट करण्यासाठी लोक पर्यावरणाला घातक असलेल्या वस्तूंचा वापर करू लागले थर्माकोल पासून सुरू झालेली सुरुवात आता तर कुठपर्यंत पोहोचली याचा विचार न केलेलाच बरा.विचार करायला लागलो की मेंदू अगदी सुन्न होतो. आता तर लोकांनी थर्माकोलला पर्याय म्हणून फोम शोधून काढला आहे. पण फोमही विघटनशील नाही हे लोकांना माहीतच नाही की माहित नसल्याचा अविर्भाव दाखवत आहे हेच कळत नाही.आता तर सजावटीसाठी उपयोगात येणारी प्लास्टिकची फुले, मणी,माळा, तोरणे, पुष्पगुच्छ,नकली बांबूची व इतर प्रकारची झाडे आणि बरेच काही. या सर्वांचा शेवट काय तर जुने झाल्यावर कचराकुंडीत जातील आणि त्याचे बारीक बारीक तुकडे होऊन ते असेच जमिनीवर चिरकाल राहतील व पर्यावरणाला हानी पोहोचवतील.
गणपती बाप्पाच्या मूर्तीवर सजावटीसाठी गेल्या चार-पाच वर्षात मुकुट, हार, बांगड्या, बुगडी,अंगठी, कंठी ,बाजूबंद या सर्व अलंकारांमध्ये लोकांना हिरे,खडे,मनी लावलेले असली दागिने हवे आहेत.कलर लावलेले नकोत .त्यामुळे विसर्जना वेळी त्या सर्व वस्तू पाण्यात जातात.पाण्यात आधीच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व रासायनिक रंगामुळे प्रदूषण होत होते आणि त्यात आता या वस्तूंची भर पडत आहे.बिचारे मुके जलचर ही व्यथा कोणाकडे मांडणार?या सर्व सजावटीच्या वस्तूंमुळे प्राण्यांच्या जीवाला कमालीचा धोका उद्भवू लागला आहे. हे सर्व पाहिल्यावर मनात प्रश्न पडतो की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव यासाठी सुरू केला होता का? कुठे त्यांचा थोर विचार आणि कुठे आजच्या लोकांची मानसिकता. अर्थात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसेच प्रत्येक गोष्टीला ही दोन बाजू असतात. गणेशोत्सव मंडळ वर्गणीतून तसेच देणगी मधून अनेक समाज विधायक कार्य करताना आपल्याला दिसून येतात जसे रक्तदान शिबीर, अनाथाश्रमांना मदत, गोरगरिबांना मदत, मोफत बॉडी चेकअप, मोफत शस्त्रक्रिया, मोफत रुग्णवाहिका यासारखी समाज उपयोगी कामे;सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समाज प्रबोधन पर देखावे सादर करून जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असताना . आता बऱ्यापैकी निर्माल्य कलश ठेवून पाण्याचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले जात आहेत.पर्यावरण प्रेमी लोक घराच्या परिसरातच मूर्तीचे विसर्जन करत आहेत.थर्माकोलचा वापर कमी करून विघटनशील वस्तूंपासून देखावे निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. शाडूची मूर्ती वापरण्याविषयी लोक बऱ्यापैकी जागृत झाले आहेत. पण एवढे पुरेसे नाही.यासाठी आपण सर्वांनी पर्यावरणाचे भान राखले पाहिजे. प्रत्येक मनुष्याने जबाबदारीने वागायला हवे.
पर्यावरणाविषयीची जागरूकता सर्वांच्या मनात ठासून भरली पाहिजे. गणेशोत्सव हा देखाव्यासाठी नाही, शोबाजीसाठी तर नाहीच नाही. गणपती बाप्पाला रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागवून बाप्पा प्रसन्न होणार नाही. लवकर निजे लवकर उठे, त्यासी आरोग्य संपदा लाभे असे सांगणारी आपली संस्कृती आहे.गणेशोत्सव हा सण भक्ती रसात न्हावून निघण्यासाठी आहे. मोठ्या भक्ती भावाने त्याची पूजा पाठ करणे त्यासाठी फक्त दोन हात व एक मस्तक पुरेसे आहे.
गणेशोत्सव लोकांनी एकत्र येऊन समाज उपयोगी कामे करण्यासाठी आहे.सर्वांनी एकत्रित येऊन समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आहे. जसे पर्यावरण जागृती, कचरा निर्मूलन, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, झाडे लावून निसर्गाचे संवर्धन करणे,प्लास्टिक कचऱ्याच्या समस्या दूर करणे, घरच्या घरी किंवा सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्यापासून खत प्रकल्प राबवणे. समाजासमोर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत .यावर उपाय शोधून त्याबाबत उपक्रम राबवणे व त्याची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज झाली आहे. प्रत्येक वेळी शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा व केवळ बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा त्यात आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे .असे केल्याने नक्कीच गणपती बाप्पा आपल्याला प्रसन्न होईल. देव देवळात नसून वृक्षात आहे, निसर्गात आहे, माणसांमध्ये आहे. त्याची आपण जपणुक करूया व सर्वांशी माणसासारखे वागूया. गणेशोत्सवच नाही तर इतरही सण मग ते हिंदूंचे असो व इतर धर्मांचे असोत.ते साजरा करताना जल,वायू,ध्वनी यांचे प्रदूषण होणार नाही याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. आपले भारतीय सण उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. मूर्ती लहान हवी व श्रद्धा मोठी हवी. नदी,तलाव,सागर किनारे हे स्वच्छ ठेवणे आपले कामच आहे. अनंत चतुर्थीच्या नंतर जर आपण समुद्रकिनारे बघितले तर आपल्यालाच आपली लाज वाटते आणि बाप्पा विषयीचा हाच का आपला आदरभाव,भक्ती भाव?हा प्रश्न पडतो. कदाचित यामुळेच की काय अनंत चतुर्थी नंतर म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील तिसरा शनिवार 'जागतिक किनारपट्टी स्वच्छता अभियान दिन' म्हणून साजरा केला जातो. कसे आहे ना परिसर अस्वच्छ करायचा आणि नंतर स्वच्छता अभियान राबवायचे. त्यापेक्षा परिसर अस्वच्छ होणार नाही म्हणून उपाय योजना केली तर किती बरे होईल आणि ही सर्वांची जबाबदारी आहे.बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आहे आपण सगळ्यांना तो पर्यावरणाचे रक्षण करण्याची बुद्धी देवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. शेवटी निसर्ग आहे तर आपण आहोत.
.jpg)


Post a Comment
0 Comments