राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी. वावा यांची केडीएमसीला भेट
केडीएमसीने सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत केलेल्या वचनपुर्तीसाठी केले समाधान व्यक्त
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मंगळवारी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस आयोगामार्फत सोशल ॲडवायझर गिरीधर नाथ, समन्वयक संदिप चरण तर महापालिकेमार्फत महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव तसेच इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि विविध सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीस संबोधतांना डॉ. पी.पी. वावा यांनी गेल्यावर्षी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने महानगरपालिकेने सफाई कर्मचारी यांच्या विविध समस्यांबाबत केलेल्या वचनपुर्तीसाठी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे बुधवारी दु. 2 ते 5 या वेळेत सफाई कर्मचारी व त्यांचे प्रतिनिधींना भेटण्यासाठी वेळ देवून त्यांच्या अडचणी ऐकुन, त्यांचे करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांना सुचना दिल्या.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी गेल्यावर्षी संपन्न झालेल्या बैठकीत मांडलेल्या समस्या, अडचणी आणि त्यावर महापालिकेने केलेली कार्यवाही या संदर्भात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगासमोर संगणकीय सादरीकरण केले. यावेळी विविध सफाई कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी देखील आपले प्रस्ताव, सुचना आयोगासमोर मांडल्या व याबाबत दखल घेवून उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन संबंधितांना देण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी आयोगाचे तसेच उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व सफाई कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचे आभार मानून बैठकीची सांगता केली.
.jpg)
.jfif.jpg)
Post a Comment
0 Comments