Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचा पाच विधानसभेच्या जागांवर दावा

 ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचा पाच विधानसभेच्या जागांवर दावा

                      ब्लॅक अँड व्हाईट/ठाणे वार्ताहर 

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी उजवी झाली असून त्यात ठाणे जिल्हा मागे राहिलेला नाही.जिल्ह्यात चांगले वातावरण असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीला नामोहरण करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे विधानसभेच्या 18 जागांपैकी 5 जागा लढविण्याची तयारी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. त्यामध्ये ठाणे शहर, मीरा भाईंदर, मुरबाड, अंबरनाथ आणि भिवंडी पश्चिम या विधानसभांचा समावेश असून युतीमधील मजबूत उमेदवार गळाला लागला तर आणखी एक जागाही सोडण्याची तयार दर्शविली आहे. 

ठाणे जिल्ह्यातील तीन खासदारांपैकी बाळ्या मामा म्हात्रे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असून डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के हे शिवसेनेचे खासदार आहेत. 18 आमदारांपैकी 8 आमदार भाजपचे असून शिवसेनेचे पाच आमदार आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचे दोन, मनसे एक, समाजवादी पार्टी एक आणि अपक्ष एक अशी पक्षीय बलाबल आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडे एकही आमदार नाही. राष्ट्रवादीचा शहापूरमधील आमदार दौलत दरोडा हे अजित पवार गटात गेले आहेत. फक्त मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भिवंडीचे सपाचे आमदार रसीद शेख हे दोनच आमदार महाविकास आघाडीचे आहेत. त्यामुळे जागा वाटपामध्ये फारसी रस्सीखेच होणार नसल्याची चर्चा रंगली आहे. जो जिंकल्याची क्षमता ठेवतो, त्याला ती जागा सोडायची अशी रणनीती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखलेली आहे.

राज्यात सत्ता पालट करण्यासाठी काँग्रेसने कमीपणा घेण्याचे ठरविले आहे. पाच जागांवर आपला दावा ठोकला आहे. त्यामध्ये ठाणे विधानसभा, मीरा भाईंदर, मुरबाड, अंबरनाथ आणि भिवंडी पश्चिम विधानसभांचा समावेश आहे. ठाण्यातून माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांना निवडणूक रिंगणात उतरण्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसपेक्षा शिवसेना ठाकरे गटाची ताकद ठाण्यात अधिक असल्याचा दावा केला जात आहे. मात्र ठाण्यातील चार जागांपैकी मुंब्र्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाणार असून कोपरी-पाचपाखाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. तसेच ओवळा माजिवडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ठाकरेगट उमेदवार देणार असल्याने ठाणे विधानसभा काँग्रेसला सोडणार असल्याचे बोलले जात आहे. मीरा-भाईंदर विधानसभा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडण्यास सहमती दर्शविली आहे. कारण राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांनी शिवसेनेशी सलगी केली आहे. लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडलेली भिवंडी पश्चिम विधानसभा ही काँग्रेसला सोडली जाणार असून 2019 मध्ये या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार कमी मतांच्या फरकाने पडला होता. मतविभागणीमुळे भाजपचे महेश चौगुले विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपची पिछहट झालेली दिसून आली. अंबरनाथ आणि मुरबाड विधानसभेवर काँग्रेसने दावा ठोकला आहे. आगामी राजकीय परिस्थितीनुसार मुरबाडची जागा ही राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी काँग्रेसने दर्शविल्याने जिल्ह्यात जागा वाटपाचा तिढा मार्गी लागल्याचा आशावाद काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त जात आहे.

Post a Comment

0 Comments