कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस कामाची केडीएमसी आयुक्तांनी केली पाहणी
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
आज सकाळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी कल्याण रेल्वे स्थानकासमोर, स्मार्ट सिटी विभागामार्फत सुरू असलेल्या सॅटिसच्या कामाची पाहणी केली. आज पहाटेपासूनच कल्याण परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बहुमजली पार्किंग समोर पावसाचे पाणी साचले होते. महापालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दहा हॉर्सपॉवरच्या एकूण तीन पंपांच्या सहाय्याने या पाण्याचा एका तासात निचरा केला.
सॅटिस कामांमध्ये कॅ. सुभाषचंद्र बोस चौक ते रेल्वे स्टेशन (दोन्ही बाजूने) तसेच रेल्वे स्टेशन ते बैल बाजार रस्ता या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी, अडथळ्यांवर त्वरित कार्यवाही करून क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
रेल्वे स्टेशन समोर रेल्वे विभागाने बाराशे मिमी व्यासाचा पाईप कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहाशे मिमी ड्रेनला जोडल्याने बहुमजली पार्किंग समोर पावसाचे पाणी साठले. या पाईपची पाहणी करून या पाईप मधून येणाऱ्या प्रवाहाची विल्हेवाट तांत्रिकदृष्ट्या करण्यासाठी रेल्वे विभागास कळविण्याबाबतही निर्देश महापालिका आयुक्त यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे या परिसरात इतरत्र पडलेला कचरा, फेरीवाले यांच्यावर तीव्र कारवाई कटाक्षाने करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांनी क प्रभागाचे सहा. आयुक्त तुषार सोनावणे यांना दिले.
.jpg)
.jfif.jpg)
Post a Comment
0 Comments